परभणी: शेतीची वाटणी (Shetwatani) म्हटलं की अनेकदा भाऊबंदकीचे, मालमत्तेवरून होणारे वाद आणि अगदी कोर्ट-कचेऱ्यांचे प्रसंग डोळ्यासमोर येतात. काहीवेळा तर जमिनीच्या एका तुकड्यासाठी नात्यांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होतो किंवा वाद विकोपाला जातात. मात्र, परभणी जिल्ह्यातील तीन भावांनी याला अपवाद ठरवत एक असा आदर्श घालून दिला आहे, ज्याची चर्चा सध्या राज्यभर होत आहे. त्यांनी जमिनीपेक्षा नात्याला अधिक महत्त्व देत कौटुंबिक बंध जपले आहेत.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील दहिफळे बंधूंनी (Dahiphale Brothers) आपल्या कृतीतून एक नवा पायंडा पाडला आहे. वडील रंगनाथराव दहिफळे यांच्या कुटुंबात त्यांची तीन मुले आणि एक मुलगी, नात असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तीन मुलांपैकी, मोठे चिरंजीव बाळासाहेब आणि धाकटे युवराज हे दोघेही प्राध्यापक (Professor) आहेत. तर मधला मुलगा केशव मात्र गावात राहून शेती सांभाळतो.
जेव्हा दहिफळे कुटुंबानं शेती वाटणीचा निर्णय घेतला, तेव्हा प्राध्यापक असलेल्या बाळासाहेब आणि युवराज यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि हृदयस्पर्शी निर्णय घेतला. त्यांना नोकरी असल्यामुळे, त्यांनी आपल्या मधल्या भावाला, केशव याला, शेतीचा मोठा वाटा दिला. या मुलांच्या उदार आणि प्रेमळ निर्णयानं वडील रंगनाथराव दहिफळे यांना अतीव आनंद झाला आहे. हा निर्णय केवळ जमीन वाटणीपुरता मर्यादित नसून, नात्यांमधील सलोखा, त्याग आणि परस्पर सामंजस्याचं एक उत्तम उदाहरण ठरला आहे, जो इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.
( note: मोबाईल च्या अर्ध्या स्क्रीनच्या वरील भागावर व्हिडिओ पहा खालच्या अर्ध्या भागात बॅकग्राऊंड चालू आहे)