सोशल मीडियावर ओवी नावाच्या मुलीची चर्चा, तिच्या भाषणाने जिंकली सर्वांची मनं
काही दिवसांपूर्वी राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, एक चिमुकली मुलगी आपल्या आईला मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इंग्रजी शब्दांऐवजी मराठी शब्द वापरण्याचा तिचा आग्रह पाहून अनेकांनी या चिमुकलीचे कौतुक केले आहे आणि तिला ‘मराठी भाषेचं भविष्य’ असं संबोधलं आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील मुलीचं नाव ओवी त्रुतुजा विशाल सावंत असून ती नालासोपारा येथे राहते. एवढ्या लहान वयात तिला आपल्या मातृभाषेबद्दल असलेली ओढ आणि अभिमान पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.
आई-मुलीचा व्हायरल संवाद
व्हिडीओमध्ये ओवीची आई तिच्याशी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करताना दिसते. आई विचारते, “जेवण टेस्टी आहे का?” यावर ओवी लगेच आईला दुरुस्त करते आणि म्हणते, “टेस्टी बोलायचं नाही. मराठीत ‘टेस्टी’ हा शब्द येत नाही, ‘छान’ बोलायचं. ‘जेवण छान आहे’ असं म्हणायचं.”
हा निरागस पण महत्त्वाचा संवाद पाहून सोशल मीडियावर या व्हिडीओची खूप चर्चा होत आहे. मातृभाषेबद्दल ओवीला असलेली ही समज पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
vinu_tambitkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर हजारो प्रतिक्रिया येत आहेत.
- “मराठी भाषेबद्दल लहान वयात एवढी समज असणे हे आपल्या घरातील संस्कार आणि बाळकडू दर्शवते.”
- “प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा असाच अभिमान असायला हवा.”
- “अशा मुली आपोआप जन्माला येत नाहीत, त्यांना असे संस्कार द्यावे लागतात.”
- “या पिढीमुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक आशेचा किरण दिसतोय.”
- “आपण आपल्या भाषेवर ठाम राहिल्यास जगही त्याची दखल घेतेच.”
या व्हिडीओने सिद्ध केले आहे की, नवीन पिढी आपली भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी किती उत्सुक आहे. खऱ्या अर्थाने या चिमुकलीने मराठी असल्याचा अभिमान म्हणजे काय हे दाखवून दिले आहे.