नवी दिल्ली/मुंबई: जुलै २०२५ महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस वापरकर्त्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात केली असून, दिल्लीपासून मुंबईपर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाले आहेत. आज, १ जुलै २०२५ पासून सुधारित एलपीजी सिलेंडरचे दर लागू झाले आहेत.
यावेळी, इंधन कंपन्यांनी केवळ १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. दिल्लीत या सिलेंडरची किंमत ५८ रुपयांनी कमी झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे १४ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ते दर पूर्वीप्रमाणेच कायम आहेत.
साम टिव्ही नवीन गॅस सिलेंडर दर युट्यूब व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रमुख शहरांतील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवे दर
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCl) च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, १ जुलैपासून लागू झालेले व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे सुधारित दर खालीलप्रमाणे आहेत:
- दिल्ली: पूर्वी १७२३.५० रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलेंडर आता १६६५ रुपयांना उपलब्ध असेल.
- कोलकाता: १९ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत १८२६ रुपयांवरून कमी होऊन १७६९ रुपये झाली आहे.
- मुंबई: मुंबईत एलपीजी सिलेंडरचा दर १६७४.५० रुपयांवरून कमी होऊन १६१६.५० रुपये झाला आहे.
- चेन्नई: चेन्नईमध्ये १८८१ रुपयांना मिळणारा सिलेंडर आता १८२३.५० रुपयांना उपलब्ध आहे.
मागील महिन्यातही झाली होती कपात
गेल्या महिन्यात म्हणजेच १ जून २०२५ रोजी देखील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी प्रति सिलेंडर २४ रुपयांची कपात करण्यात आली होती. त्या कपातीनंतर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरचा दर १७२३.५० रुपये (पूर्वी १७४७.५० रुपये), कोलकातामध्ये १८२६ रुपये, मुंबईत १६७४.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १८८१ रुपये झाला होता.
इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती, भारतीय रुपयाची स्थिती आणि इतर बाजारपेठेतील परिस्थिती विचारात घेऊन एलपीजी सिलेंडरच्या दरांची समीक्षा करतात आणि त्यात बदल करतात.
१९ किलो गॅस सिलेंडरच्या दरातील ही घट प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणाऱ्या इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी दिलासादायक आहे. सद्यस्थितीत केवळ व्यावसायिक एलपीजीच्या दरात बदल झाला असून, घरगुती सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.