Ladki Bahin Yojana List: मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजने’ ला एक वर्ष पूर्ण झाले आहे, आणि या योजनेने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून महिन्याचा ११वा हप्ता आजपासून (सोमवार, ३० जून) लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याची घोषणा केली आहे. या हप्त्यासाठी एकूण ₹3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हप्त्याविषयी उपमुख्यमंत्री पवारांची माहिती
रविवारी (२९ जून) पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना भविष्यातही नियमितपणे सुरू राहील.
जून महिन्याचा हप्ता काहीसा उशिराने येत असल्याने, जून आणि जुलैचा एकत्रित ₹3000 चा हप्ता मिळेल अशी चर्चा महिलांमध्ये सुरू होती. मात्र, उपमुख्यमंत्री पवारांनी यावर स्पष्टीकरण दिले की, सध्या केवळ जूनचाच हप्ता जमा होणार असून, तो आजपासून खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.
अपात्र लाभार्थ्यांवर कठोर कारवाई सुरू
दरम्यान, राज्य सरकारने ‘लाडकी बहीण योजने’तील अपात्र लाभार्थ्यांना मिळणारा लाभ रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. काही महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर, शासनाने त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी सुरू केली आहे.
- ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
- यामुळे केवळ खऱ्या गरजू आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, याची खात्री केली जात आहे.
लाभार्थी महिलांनी आपला जून महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी आपल्या बँक पासबुकमध्ये नोंद किंवा ऑनलाइन बँकिंगद्वारे माहिती घ्यावी.
लाडकि बहीण योजना अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/