Lek Ladki Yojana: या योजनेतर्गत पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना जन्मानंतर लाभ मिळणार आहेत. यासाठी 19 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त, नवी मुंबई यांच्यामार्फत ₹19.70 कोटींची रक्कम 36 जिल्ह्यांना वितरित करण्यात आली आहे. या संदर्भात विभागातर्फे 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
आतापर्यंत, जिल्हा प्रशासनाकडे जवळपास 35,000 अर्ज प्राप्त झाले असून, येत्या 15 दिवसांत तालुकानिहाय/जिल्हानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
किती लाभ मिळणार
या योजनेतर्गत पिवळे आणि केशरी राशनकार्ड असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना याचा लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे (वय १८ वर्षे) पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये या प्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.
कोणाला मिळणार लाभ
- ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.
- तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा Lek Ladki Yojana Apply
आपला अर्ज सादर करण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करून आपला अर्ज सादर करावा.